सातारा : पाडेगाव संशोधन केंद्राकडून उसाचे १७ वाण विकसित

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडून सुमारे १७ उसाचे वाण विकसित केले आहेत. महाराष्ट्रात ८० ते ८५ टक्के क्षेत्र पाडेगावच्या ऊस वाणाने व्यापले आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची ऊस पंढरी म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. या केंद्रातील जाती आणि संशोधनाचे निष्कर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे. स्वातंत्र पूर्व काळात १८९२ साली पुण्याजवळील मांजरी येथे ऊस संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यावेळी उसाचे अधिक उत्पादन आणि गुळाच्या चांगल्या प्रतिसाठी उसाच्या सुधारित लागवड पद्धती जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी संशोधन केले जात होते. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचनाची व्यवस्था व साखर कारखान्यांची उभारणी झाल्यामुळे ऊस पिकांवर सर्वकष संशोधन होण्याची गरज भासू लागली. त्याअनुषंगाने सन १९३२ साली मांजरी येथील संशोधन केंद्र स्थलांतरित करून पाडेगाव येथे या केंद्राची स्थापना झाली.

उसाचे जास्त उत्पादन व साखरेचा जास्त उतारा देणाऱ्या नवीन ऊस बाणाची पैदास करणे आणि अधिक ऊस उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे. हवामान बदलाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करण्यासाठी पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने नवनवीन उत्कृष्ट ऊस वाण निर्मितीची देदीप्यमान व उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या केंद्राला ९४ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्राने आजपर्यंत १७ वाण विकसित केले आहेत. शाश्वत व अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या ११० मोलाच्या शिफारशी दिल्याची माहिती ऊस विशेषतज्ज डॉ. राजेंद्र भिलारे व डॉ. सूरज नलावडे यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना दिली.

संशोधन केंद्राने विकसित केलेले वाण

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने को ४१९, को ७४०, को ७२१९ (संजीवनी), कोएम ७१२५ (संपदा), को ७५२७, कोएम ८८१२१ (कृष्णा), को ८०१४ (महालक्ष्मी), को ८६०३२ (नीरा), को ९४०१२ (फुले सावित्री), कोएम ०२६५ (फुले-२६५), को ९२००५ (फुले ९२००५), एमएस १०००१ (फुले १०००१), कोएम ०९०५७ (फुले ०९०५७), कोएम ११०८२, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १३००७, फुले ऊस १५००६, असे अनेक सरस वाण विकसित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here