वॉशिंग्टन : कोका-कोला कंपनीने आपल्या सूचनेनुसार त्यांच्या उत्पादनांमध्ये खऱ्या उसाच्या साखरेचा वापर करण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ते एक चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे. तथापि, सॉफ्ट ड्रिंक उत्पादक कंपनीने अद्याप या बदलाची पुष्टी केलेली नाही. ट्रंप यांनी ट्रुथ या सोशलवरील त्यांच्या पोस्टमध्ये असा दावा केला की, दिग्गज पेय निर्माती कंपनी कोका-कोलानेदेखील यावर सहमती दर्शविली आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, मी अमेरिकेतील कोका-कोलामध्ये खऱ्या उसाच्या साखरेचा वापर करण्याबद्दल कंपनीशी बोलत आहे. त्यांनी ते करण्यास सहमती दर्शविली आहे. याबद्दल मी कोका-कोलाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. दरम्यान, कोका-कोलाने आशयातील कोणत्याही बदलाची तात्काळ पुष्टी केली नाही, परंतु ट्रम्प यांच्या पाठिंब्याची कबुली देत एक संक्षिप्त निवेदन जारी केले.
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या प्रतिष्ठित कोका-कोला ब्रँडबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उत्साहाचे आम्ही कौतुक करतो. आमच्या कोका -कोला उत्पादन श्रेणीतील नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांबद्दल अधिक माहिती लवकरच शेअर केली जाईल. कंपनीने म्हटले आहे कि, कोका-कोला कंपनी लोकांना आवडतील अशा उत्पादनांची निर्मिती करण्याचा अभिमान बाळगते. आमच्या ६० हून अधिक स्वतंत्र बॉटलिंग भागीदारांसह, कोका-कोला सिस्टम दरवर्षी अमेरिकेत ५८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक व्यवसाय आणि ८,६०,००० हून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.