सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील होते. यावेळी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ व एआय तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी २०० टन ऊस उत्पादन शक्य आहे. एआय तंत्रज्ञान ऊस लागवडीसाठी रोपांचा वापर, पिकाची अन्नद्रव्यांची गरज, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करते. यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे शक्य आहे, असे मत त्यांनी शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.
डॉ. विवेक भोईटे म्हणाले की, सध्या शेतकरी लागवडीनंतर साडेतीन ते चार महिन्यांपर्यंत उसाची काळजी घेतात. मात्र, त्यानंतर फक्त पाणी देतात. एआयच्या मदतीने पिकाची भूक, अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि रिकव्हरी याबाबत अचूक माहिती मिळते. अति पाण्यामुळे जमीन नापीक होते, एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांन हेक्टरी २५ हजार रुपये खर्चात उत्पादन वाढवता येते. यावेळी संचालक जशराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे कृषी व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, सुनील जगदाळे आदी उपस्थित होते. कृषी अधिकारी चव्हाण यांनी सुत्रसंचालन केले. प्राचार्य सुनिल राठोड यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.