मुंबई : भारतीयांमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे स्वयंपाकाचे तेल, साखर, मीठ यांच्या वापरात लक्षणीय घट होत आहे, असे उद्योगांच्या आकडेवारीवरून दिसून येते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने काही प्रमाणात या बदलाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी या घटकांचे सेवन कमी करण्याच्या आवाहनाला दिले आहे. सीएआयटीचे राष्ट्रीय सचिव आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले की, देशांतर्गत वापराशी थेट जोडलेली खाद्यतेल आयात मे महिन्यात २२ टक्यांनी कमी होऊन ११.७८ लाख टन झाली. एप्रिलमध्येही असाच ट्रेंड दिसून आला, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ टक्के घट झाली आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्या वत्तानुसार, भारतात दरवर्षी दरडोई खाद्यतेलाचा वापर १८ किलो आहे, तर साखर सुमारे २० किलो आहे. तथापि, अलिकडच्या काही महिन्यांत, ग्राहकांच्या बदलत्या पसंती, हंगामी घटक आणि आरोग्यावरील परिणामांबद्दल वाढती जागरूकता यामुळे वापर कमी झाला आहे. जून महिन्यात, सरकारने दिलेल्या २३ लाख टन साखरेच्या कोट्यापैकी १ लाख टन साखर विक्री न झालेली राहिली. यातून मागणी कमी झाल्याचे संकेत मिळतात. सोशल मीडिया ट्रेंडमुळे रिफाइंड साखरेपेक्षा गुळाची वाढलेली लोकप्रियतादेखील या घसरणीला कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सरकारने ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान घरगुती वापरासाठी २२९.५ लाख टन साखर वाटप केली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. याबाबत ठक्कर म्हणाले की, उन्हाळ्यात, स्वयंपाकाच्या तेलाचा वापर नैसर्गिकरित्या कमी होतो. परंतु यावर्षी आरोग्याबाबत जागरूक निवडी आणि लहान पॅकेजिंगमुळे ही घट अधिक तीव्र आहे.