अहिल्यानगर : अशोक साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांना शेतकरी संघटना, ऊस उत्पादक सभासद, कामगार व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ऊस दराबद्दल निवेदन दिले. राहुरी व वैजापूर तालुक्यातील नव्या पंचगंगा शुगरने ३०५० रुपये प्रति टन दर जाहीर केला आहे. यामुळे कार्यक्षेत्रातील सुमारे १० लाख मेट्रिक टन ऊस बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या कारखान्याने यंदा ऊस उत्पादकांना गाळप हंगामासाठी किमान ३५०० रुपये प्रतीटन दर द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केली. अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकरी ऊस दुसऱ्या कारखान्याकडे वळवतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
याबाबत शेतकरी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अशोक’कडे इथेनॉल आणि वीजनिर्मिती प्रकल्प असूनही दर कमी, पगार रखडलेले आणि कारभार अकार्यक्षम आहे. या निवेदनामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नसून, ‘अशोक’ ही तालुक्याची कामधेनू आहे. तिचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी, सभासद व कामगारांनी एकत्र येऊन ही मागणी केली, असे औताडे यांनी म्हटले आहे. गेल्या दोन हंगामात ‘अशोक’ने गणेश कारखान्याच्या तुलनेत ८०० रुपये प्रति टन दराने कमी दर दिला आहे. हे थकबाकी स्वरूपात पैसे सभेपूर्वी खात्यात वर्ग करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.