लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी गुरुवारी भारतासोबतच्या व्यापार कराराचे कौतुक केले आणि तो ब्रिटनसाठी एक मोठा विजय असल्याचे म्हटले. एक्स वरील एका पोस्टमध्ये ते म्हणाले, भारतासोबतचा आमचा ऐतिहासिक व्यापार करार ब्रिटनसाठी एक मोठा विजय आहे. यमुले कष्टकरी ब्रिटनच्या खिशात अधिक पैसे येतील आणि लोकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मुक्त व्यापार करार (FTA) वर स्वाक्षरी करून भारत आणि ब्रिटनने आर्थिक सहकार्याच्या एका नवीन युगाची सुरुवात केली आहे, असे सांगितले. एकत्रितपणे, आपण एका नवीन इतिहासाची पायाभरणी करत आहोत. या वर्षी आपण तिसऱ्यांदा भेटत आहोत. मी हे खूप महत्त्वाचे मानतो.
ब्रिटन आणि भारत हे नैसर्गिक भागीदार आहेत. आज आपल्या संबंधांमध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे. यामुळे भारत आणि ब्रिटनच्या भावी पिढ्यांसाठी एक अतिशय मजबूत मार्ग मोकळा होईल. यामुळे व्यवसाय आणि व्यापारात एक नवीन अध्याय जोडला जात आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत बहुप्रतिक्षित भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीला चालना देण्याचे या कराराचे उद्दिष्ट आहे.