अहिल्यानगर: नवी दिल्लीतील शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्यावतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांना देशपातळीवरील सर्वोच्च ‘जीवनगौरव पुरस्कार’ ( लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड) प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व दि शुगर टेक्नॉलॉजी असोशिएशनचे प्रेसिडेंट संजय अवस्थी आणि मान्यवरांच्या हस्ते मानपत्र कोल्हे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्य, नावीन्यपूर्ण उपक्रम व तांत्रिक उत्कर्षासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. समारंभासाठी माजी मंत्री जयंत पाटील, रणजित पुरी, एन. चिन्नप्पन, संभाजीराव कडू पाटील, डॉ. सीमा परोहा, कोल्हे कारखाना अध्यक्ष व इफ्को दिल्लीचे संचालक विवेक कोल्हे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे, बिपीन कोल्हे आणि तिसरी पिढी कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी साखर उद्योगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. कोल्हे यांनी कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध तांत्रिक व आर्थिक उपक्रम यशस्वीपणे राबवले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देश-विदेशातील साखर तंत्रज्ञानाचा अभ्यास करून कारखानदारीत आधुनिकीकरण केले आहे. इथेनॉल उत्पादन क्षेत्रात कोल्हे कारखान्याने देशात सर्व प्रथम आघाडी घेतली. शेतकऱ्यांच्या बांधावर नव्या सुविधा पोहोचवल्या. त्याची दखल देशात अनेक पातळीवर घेतली गेली. शंभर वर्षांहून अधिक काळापासून साखर उद्योगातील तांत्रिक व शाश्वत प्रगतीसाठी कार्यरत असलेली शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन दरवर्षी साखर क्षेत्रात विशिष्ट योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करते.