नवी दिल्ली : जागतिक बाजारातील इथेनॉलच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या आणि कृषी मालाच्या किमतींवर अवलंबून असतात. इथेनॉलच्या मोठ्या प्रमाणावर निर्यातीसाठी योग्य साठवणूक, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स या आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती वाढल्याने त्याचा अन्नधान्य उपलब्धतेवर आणि किमतींवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सर्वंकष विचार करूनच इथेनॉल निर्यातीचा निर्णय घेतला जावा अशी सूचना इथेनॉल उत्पादक उद्योजकांनी केंद्र सरकारला केली आहे.
इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन दिल्याने उत्पादन वाढले. जुलै २०२५ पर्यंत देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता १, ५८९ कोटी लिटर प्रतिवर्ष इतकी झाली आहे. भारतातील इथेनॉलचा मुख्य वापर पेट्रोलमध्ये मिश्रण म्हणून होतो. याशिवाय, मद्यार्क उद्योग आणि औद्योगिक कारणांसाठीही होतो. इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ मध्ये जून २०२५ अखेर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १९.९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. हे प्रमाण २० टक्के मिश्रणाच्या उद्दिष्टाच्या अगदी जवळ आहे. केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी इथेनॉल निर्यातीबाबत सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. मात्र उद्योगातून पुरेसे इथेनॉल तयार करा, मगच निर्यातीचा विचार करा. देशातील गरज पाहून निर्णय घ्यावेत, असा सल्ला उद्योजकांनी दिला आहे. सध्या इथेनॉल उत्पादन क्षमता वाढली असली, तरी २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अजूनही काही प्रमाणात इथेनॉलची गरज भासेल असा मतप्रवाह आहे.