कोल्हापूर : कोल्हापूर कामगार न्यायालयाचे न्या. एन. ए. मालुंजकर यांनी गडहिंग्लज तालुका आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) सेवेतून २०१४ पासून निवृत्त झालेल्या १०२ कामगारांची ग्रॅच्युईटी व इतर देणी असे एकूण दोन कोटी ३४ लाख ६४५० रुपये व अधिक आठ टक्के व्याजासह देण्याचे आदेश कारखाना व्यवस्थापन व ब्रिस्क कंपनीला दिला आहे. गोडसाखर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी संचालक शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कामगारांच्या बाजूने ॲड. अशोक उपाध्ये व सिद्धार्थ उपाध्ये यांनी कोर्टात काम पाहिले.
या यशाबद्दल सर्व निवृत्त कामगारांतर्फे खोत यांचा गौरव करण्यात आला. निकालाविषयी माहिती देताना खोत म्हणाले की, २०१४ पासून निवृत्त झालेल्या सहाशेहून अधिक कामगारांच्या मॅच्युईटीसह इतर देणी ब्रिस्क कंपनीसह कारखाना व्यवस्थापनाकडे थकीत आहेत. त्यासाठी चार-पाच वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करीत आहे. पहिल्या टप्प्यात दावा दाखल केलेल्या १०२ कामगारांची दोन कोटी ३४ लाखांची देणी देण्याचा निकाल आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील १५० कामगारांच्या देण्यांचा दावाही दाखल केला आहे. सर्व निवृत्त कामगारांचे हक्काचे पैसे मिळवून देऊ.