पुणे : नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी पंचविसाव्या ऊस गळीत हंगामासाठी ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याच्या यंत्रणांची तयारी अंतिम टप्प्यात असून, शासन धोरणानुसार हंगाम वेळेवर सुरू करण्याचे नियोजन पूर्णत्वास येत आहे. गेल्या २४ वर्षांपासून कारखाना शेतकऱ्यांना चांगला दर दिला जात आहे. भविष्यातही हे नाते मजबूत राहावे यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे नोंदवावा असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले. कारखान्यात बसविण्यात येणाऱ्या नवीन मिल रोलरचे पूजन रविवारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील आणि अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी अध्यक्षा भाग्यश्री पाटील म्हणाल्या की, ऊस पिकासाठी एआय तंत्रज्ञान फायदेशीर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी एआय आधारित शेतीकडे वळावे. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कारखान्याने दररोज सुमारे ६५०० मे. टन ऊस गाळप क्षमतेची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कारखान्याची ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्था सज्ज आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. कार्यक्रमाला उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक लालासाहेब पवार, ॲड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, कल्पना शिंदे, संगिता पोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले.