कोल्हापूर : शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय)च्यावतीने २४ ते २६ जुलै या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम-कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ८३ वे आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शन व शताब्दी वार्षिक अधिवेशन झाले. अधिवेशनात येथील दत्त साखर कारखान्यातर्फे ऊस शेती, सेंद्रिय कर्ब वाढ आणि जमीन क्षारपड मुक्तीबाबत तांत्रिक संशोधन प्रबंधाचे सादरीकरण करण्यात आले. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी, संशोधन प्रबंधचे सादरीकरण करताना, कारखान्याने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या क्षारपडमुक्तीच्या या ‘दत्त पॅटर्न’चे कौतुक करून त्यांचा विशेष सन्मान केला.
यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर ८० पेक्षा अधिक संशोधन प्रबंध सादर झाले. शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अमित खट्टर, दत्तचे संचालक इंद्रजित पाटील, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे आदी उपस्थित होते. दत्तचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी ऊस उत्पादन वाढीसाठीच्या ऊस विकास योजना, सेंद्रिय कर्ब वाढीसाठी केलेले विविध प्रयोग, दहा हजार एकरावरती सच्छिद्र पाईपलाईनच्या माध्यमातून झालेली जमीन क्षारपड मुक्ती आणि प्रत्यक्षात चार हजार एकर जमिनीमध्ये घेण्यात येत असलेले विविध पिकांचे उत्पादन यांचा संपूर्ण आढावा घेऊन माहिती दिली.