लातूर : मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर ) च्या २०२५-२६ च्या गाळपाच्या निमित्ताने आयोजित मिल रोलर पूजन माजी मंत्री दिलीपराव देशमुख व लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी कारखानास्थळी होत असलेल्या महादेव मंदिर, गणेश मंदिर आणि हनुमान मंदिराचे तसेच नवीन साखर गोडाउनचे भूमिपूजन करण्यात आले. यंदा साखर कारखान्यात या हंगामामध्ये सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. उसाला रास्त दर देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
कारखाना कार्यक्षेत्रातील ६०० हेक्टरवर कारखान्याच्या वतीने ‘एआय’च्या माध्यमातून ऊस उत्पादक लागवडीसाठी प्रात्यक्षिक पूर्ण केले असून ऊस विकास योजनेंतर्गत २७ हजार ७५० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रोपे देण्यात आली आहेत. कारखाना परिसरात दोन वर्षांत ३८ हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व माजी आमदार वैजनाथ शिंदे, मुकुंदराव डोंगरे, विजय डोंगरे, अजिंक्य सरडे, बप्पा डोंगरे, रसिक दुलंगे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, ‘जागृती शुगर’चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मांजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, ट्वेंटी वन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, धनंजय देशमुख, अनंतराव देशमुख, श्याम भोसले, सर्जेराव मोरे, रवींद्र काळे आदी उपस्थित होते.