सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात अनेक साखर कारखाने आहेत. गत वर्षी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना तब्बल आठ महिने उलटून गेले, तरी अद्याप उसाचे बिल मिळाले नाही. शेतकरी बिलासाठी कारखान्याला सतत हेलपाटे मारत आहे. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस शेजारील कर्नाटक राज्यातील केपीआर साखर कारखान्याला देण्याचा एकमुखी निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यंदा स्थानिक कारखानदारांना ऊस मिळणे कठीण आहे.
याबाबत येथील मार्केट यार्डात बैठक झाली. यावेळी केपीआर साखर कारखान्याकडून आलेले अधिकारी, कर्मचारी, तोडणी, वाहतूक अधिकारी पारती बन, शेती अधिकारी सिद्धू किणगी, ट्रान्सपोर्ट मॅनेजर सोमशेखर शिंपी, अशोक कोळारी आदी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील साखर कारखानाधारकाकडून ऊस उत्पादकांची सतत फसवेगिरी होत आहे. दिलेले शब्द पाळत नाहीत. वेळेवर बिल देत नाहीत असे मत शेतकऱ्यांनी मांडले. यावेळी स्वामीनाथ हिप्परगी, बसवराज धिवारे, स्वामीनाथ आलदी, सिद्धाराम हिप्परगी, संगमेश हिप्परगी, काशिनाथ कुडले, हरी सुरवसे, महादेव सुरवसे, भारत तदेवाडी, शीतल भरमशेट्टी, राजू नागोरे, श्याम सुरवसे, प्रताप सुरवसे, विश्वनाथ हळगोदे, शिव सरसंबी, अशोक कोकरे, संगमेश्वर हिप्परगी, सिद्धाराम हिप्परगी, सोन्या पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.