कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे १२ हजार एकरवरील पिकावर हुमणी किडीने हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. हुमणी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने ऊस, भुईमूग या पिकांचा रंगच बदलून पिके निस्तेज दिसू लागली आहेत. अळी नियंत्रणासाठी कीटकनाशकचा वापर सुरू झाला आहे. परंतु याचा वापर मुळांपर्यंत होत नसल्याने ही अळी शंभर टक्के नियंत्रणात येणे अवघड बनले आहे. त्यामुळे उसाचे १० ते १५ टक्के नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. उसाचे एकरी ३० हजार तर भुईमुगाचे एकरी २० हजार रुपयांचे नुकसान होणार आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून हुमणीची चर्चा सुरू आहे. परंतु कृषी विभाग मात्र अजूनही जागृत झाला नसल्याच्या तक्रारी आहेत.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये आदी पिके घेतली आहेत. ऊस लागणीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात सरी सोडून आंतरपिके केली आहेत. त्यानंतर आडसाली लावणी सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ३९० हेक्टरवर लागणी झाल्या आहे. जिल्ह्यात २ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस आहे. यातील जेथे माळरान आहे, पाणी साचण्याचे प्रमाण कमी आहे, अशा ठिकाणी असणाऱ्या उस भुईमुगाच्या शेतात हुमणी मुळ्या फस्त करत आहेत. यामुळे शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. हुमणी रोखण्यासाठी ऊस शेतीत फीप्रोनील व इमीडाक्लोप्रिड तर भुईमुगासाठी कार्बोफ्युरॉन या रासायनिक कीटकनाशकांचा तर बिवेरिया व मेटारायजम या जैविक कीटकनाशकाचा वापर करून हुमणी नियंत्रण करावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.