सोलापूर : आरआरसीचा बडगा, गोकुळ, जय हिंद साखर कारखान्यांची मशिनरी सील

सोलापूर : सलग तीन नोटिसा दिल्यानंतरही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिलाची देणी देण्यास असमर्थ ठरलेल्या गोकुळ शुगर आणि जय हिंद शुगर या दोन साखर कारखान्यांची यंत्रसामग्री (मशिनरी) महसूल प्रशासनाने अखेर सील केली. सात महिने उलटून गेले तरीही या दोन साखर कारखान्यांनी ३८ कोटी रुपयांची ऊस बिले दिलेली नाहीत. या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे पैसे वेळेत अदा करण्यासाठी शासनाने कारखानदारासमवेत बैठका घेतल्या. रक्कम देण्यासाठी त्यांना मुदत दिली. मात्र, दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या रकमा अदा केल्या नाही. त्यामुळे तिसऱ्या नोटिशीनंतर आरआरसी कारवाईची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली.

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत म्हटले आहे कि, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी गुरुवारी स्वतः दोन्ही कारखान्यांत जाऊन पाहणी केली. याच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुळ आणि जय हिंद शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाची बैठक बोलावली होती. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही कारखान्यांनी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. गुरुवारी ही मुदत संपताच प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले. कारखान्याची चल मालमत्ता शिल्लक नसल्याने यंत्रसामग्री सील केली. कारवाईनंतर कारखाना व्यवस्थापनाकडे यंत्रसामग्रीच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले की, कारखान्याकडे थकीत असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी यंत्रसामग्री सील करण्यात आली असून कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवर बोजा चढवण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here