सोलापूर : गोकुळ शुगरची एफआरपी २२०० रुपयांच्या जवळपास आहे. मात्र, कारखान्याने प्रति टन २७५५ रुपये दर जाहीर केला आहे. साखर आयुक्त कार्यालय एफआरपीप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आग्रही आहे. त्याप्रमाणे गोकुळ शुगर आठ कोटी रुपये देणे असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पैसे मिळत नसल्याने गुरुवारी शेतकरी साखर सहसंचालक कार्यालयात आले होते. पैसे मिळत नसल्याने साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आता १० ऑगस्टला पैसे मिळण्याचा तोंडी शब्द देण्यात आला आहे. यावेळी रयत सेवक क्रांती संघटनेचे अमोल वेदपाठक, शफीक रीसालदार, हाजी डोंगरे, लक्ष्मण मुळे, विश्वनाथ मुळे, जितेंद्र वाघोळे, लक्ष्मण कदम, तानाजी वाघमोडे आदी शेतकरी उपस्थित होते.
एफआरपीनुसार गोकुळ शुगर शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये देणे असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, साखर सहसंचालक कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना गोकुळचे संचालक कार्तिक पाटील यांनी १० ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याचा शब्द दिला. दरम्यान, उपस्थित शेतकरी नागेश वाघोले यांनी सांगितले की, आमच्या गावातील काही शेतकऱ्यांना पंधराशे रुपयाने पैसे रात्रीपर्यंत पाठवतो, असे गोकुळचे संचालक कार्तिक पाटील यांनी सांगितले होते. मात्र, पैसे जमा झाले नाहीत. काहींना एक रुपयाही गोकुळ शुगरने दिला नाही. दरम्यान, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांनी सांगितले की, गोकुळ व मातोश्री लक्ष्मी शुगर या कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल थकविले आहे. १० ऑगस्टपर्यंत पैसे नाही दिले तर कारखानदारांना फिरू देणार नाही.