परभणी : सध्या विहीर, बोरवेलला मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी आडसाली तसेच पूर्व हंगामी ऊस लागवडीचे नियोजन करत आहेत. ऊस लागवड करताना ऊस पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच सद्यस्थितीत उभ्या ऊस पिकावरील कीड रोग यांचे व्यवस्थापन कसे करावे, या संदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सोनपेठ तालुक्यातील ट्वेंटीवन शुगर्स युनिट २ सायखेडाचे कार्यकारी संचालक सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे, ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी नागपूर येथे शेतकऱ्यांची ऊस पिकाची शेतीशाळा घेऊन शिवार फेरीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी श्रीमंत सोळंके यांच्या शेतामधील को व्हीएसआय १८१२१ ऊस जातीची निरीक्षणे दाखवून विविध ऊस जातींची ओळख बाबत माहिती दिली. शंकर सोळंके यांच्या शेतामध्ये त्यांनी फुले ऊस १५०१२ म्हणून लागवड केलेल्या ऊस जातीची तपासणी करून शासनामार्फत बंदी आणलेल्या सिओ ६२१७५ या जातीची भेसळ सदर प्रक्षेत्रामध्ये असल्याची निरीक्षणे शेतकऱ्यांना दाखवून सिओ ६२१७५ या ऊस जातीमध्ये चाबूक काणीचा प्रादुर्भाव, लोळण्याचे, पांगश्या फुटण्याचे प्रमाण असल्याने या ऊस जातीची लागवड केल्यामुळे होणारे तोटे लक्षात घेता अशा ऊस जातीची लागवड टाळण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन मार्गदर्शन केले.
शेतीशाळा वर्गामध्ये शेतकऱ्यांना ऊस पिकावरील कीड आणि रोग यांची माहिती देऊन उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्याचप्रमाणे आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीकरिता ऊस बेणे उपलब्धता, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब, ठिबक सिंचनाचा अवलंब, रासायनिक खतांचा संतुलित वापर, जिवाणू खतांचा व बायोमिक्सचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर बाबत येळकर यांनी विस्तृतपणे माहिती दिली. मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांनी कारखान्यामार्फत ऊस रोप उपलब्धतेसाठी नर्सरीचे नियोजन, कारखान्याच्या ऊस विकास उपक्रमाअंतर्गत राबवायच्या योजना तसेच शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी आवश्यक बाबीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
शेतीशाळा वर्गामध्ये विभाग प्रमुख भगवान सोळंके, गट प्रमुख शरद शिंदे, दिलीप फड, दत्ता गवळी तसेच रमेश तोंडारे, अतुल सोळंके, बालासाहेब सोळंके, शंकर सोळंके, ऍड. सचिन सोळंके, बाळासाहेब नागरगोजे, तुकाराम सोळंके, विष्णू गायके, अमोल सोळंके, राजाभाऊ सातभाई, कैलास सोळंके, विलास एसके, राजेश कदम, बाबा आदाते, सद्दाम शेख आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऊस पिका संदर्भात घेण्यात आलेल्या शिवार फेरी आणि शेतीशाळेचा उपक्रम दर पंधरवड्याला घेण्याबाबत शेतकऱ्यांनी मागणी केली.