नाशिक : जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीचा घाट घातला आहे. त्याविरोधात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील यांच्यासह कामगारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी नाशिक जिल्हा बँकेत धडक देत प्रशासक बिडवई यांना जाब विचारला. साखर कारखान्याची विक्री करण्याबाबत सभासद व कामगारांचा तीव्र विरोध असल्याचे खंडू बोडके-पाटील यांनी प्रशासकांना सांगितले. जिल्हा बँकेच्या सभागृहात शिष्टमंडळाने कारखान्याच्या विक्रीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बैठकीत सहभाग घेतला. दरम्यान, माजी आमदार अनिल कदम यांनीही जिल्हा बँक प्रशासक बिडवई यांच्याशी चर्चा केली.
बैठकीत जिल्हा बँकेचे प्रशासक बिडवई व निसाकाचे अवसायक हिरे यांनी शिष्टमंडळाला कारखाना विक्रीबाबत सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती दिली. तर खंडू बोडके-पाटील यांनी तालुक्यातील सर्वपक्षीय सभासद, कामगारांनी एकत्र येऊन जनआंदोलन उभारून कारखाना गिळंकृत करण्याचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन केले. याप्रश्नी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा त्यांनी दिला. कामगारांच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल कदम यांचीही भेट घेत व्यथा मांडल्या. सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, कामगार संघटनेचे सरचिटणीस बी. जी. पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, पिंपळसचे माजी सरपंच तानाजी पुरकर, नितीन निकम, युनियनचे उपाध्यक्ष सुभाष झोमन, खजिनदार बाळासाहेब बागस्कर, चिटणीस नवनाथ गायकवाड, उत्तम गायकवाड आदी उपस्थित होते.