सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना नेहमीप्रमाणे उच्च दर देण्याची परंपरा कायम ठेवत आगामी गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला किफायतशीर दर देण्यासाठी वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. शेंद्रे येथे कारखान्यात गळीत हंगामाची पूर्वतयारी म्हणून मशिनरी विभागाकडील मिलमधील पहिल्या रोलर पूजनप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले की, आगामी हंगामात उच्चतम साखर उतारा व कमीत कमी दिवसांत जास्तीतजास्त साखरेचे उत्पादन घेणे तसेच उपपदार्थांच्या उत्पादनावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्यानि यशस्वीरीत्या पूर्ण करून १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना वेळेत अदा केली जात आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे दिवंगत भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, सर्जेराव सावंत, जिल्हा बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, राहुल शिंदे, गणपतराव शिंदे, अजित साळुंखे, तानाजी जाधव, युनियन अध्यक्ष दिलीप शेडगे, चंद्रकांत घोरपडे आदी उपस्थित होते.