नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो- एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा) ने २०२५-२६ हंगामासाठी साखर उत्पादनाचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. उपग्रह प्रतिमांच्या आधारे आलेल्या अहवालानुसार, यंदाचे सन २०२५-२६ मधील साखर उत्पादन गेल्या हंगामापेक्षा अठरा टक्क्यांनी वाढणार आहे. यंदा ३४९ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रमुख साखर उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्र व कर्नाटकात गेल्या वर्षापेक्षा उसाची लागवड वाढली असून उत्तर प्रदेशात मात्र घटली आहे. अनुकूल मॉन्सूनमुळे उसाचे अधिक चांगले उत्पादन, लागवडीखालील क्षेत्रात झालेली किरकोळ वाढ, यामुळे साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे.
देशभरातील साखर उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ३१ जुलै रोजी बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रात २०२५-२६ हंगामासाठी ऊस क्षेत्र १४.९३ लाख हेक्टरपर्यंत वाढले असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षी ही ऊस लागवड १३.८२ लाख हेक्टर होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत अंदाजे ८ टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. कर्नाटकात ऊस क्षेत्र गेल्या वर्षी ६.४ लाख हेक्टरवरून सुमारे ६ टक्क्यांनी वाढून ६.७६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात, गेल्या हंगामात उसाचे क्षेत्र सुमारे ३ टक्क्यांनी घटून २२.५७ लाख हेक्टर झाले. गेल्या हंगामात २३.३० लाख हेक्टर होते. तथापि, उभ्या पिकाची एकूण स्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे. ऊस क्षेत्राचे फोटो, अपेक्षित उत्पादन, साखरेचे उत्पादन, पाणी उपसा टक्केवारी, मागील आणि चालू वर्षातील पावसाचा परिणाम, जलाशयांमध्ये पाण्याची उपलब्धता, अपेक्षित पाऊस आणि इतर संबंधित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामुळे साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या ९३.३४ लाख टनांवरून १३२.६८ लाख टनांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. अंदाजे ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.