साखरेच्या दरात आठवडाभरात दोन रुपयांची वाढ, केंद्राने विक्री कोटा घटवल्याचा परिणाम

पुणे : केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. हा कोटा गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल २.५ लाख टनाने कमी आहे. दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सणासुदीच्या तोंडावर याचे परिणाम जाणवू लागले आहेत. त्यामुळे साखरेच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे.आठ दिवसांपूर्वी ४४ रुपये असलेली साखर आता ४६ रुपयांवर गेली आहे. केंद्र सरकारने साखरेच्या कोट्यात कपात केली आहे. त्याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला आहे.

आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही आणखी काही प्रमाणात वाढू शकतो. केंद्र सरकारने मागणी आणि पुरवठा यातील असमतोल दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना न झाल्यास, सण उत्सवाच्या काळात साखरेची दरवाढ होऊ शकते. कोटा मर्यादित असल्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सणासुदीत मिठाईची मागणी वाढते. किराणा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा साखरेचा कोटा कमी जाहीर केलेला आहे. कोटा कमी असल्याने पुरवठ्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य आहे. सरकारने लवकरात लवकर साखरेचा कोटा वाढवावा, अशी मागणीही केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here