सोलापूर : दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या महाराष्ट्र शुगर चषक २०२५ टेनिस क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जकराया, ओंकार, युटोपियन, सिद्धेश्वर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. चुरशी झालेल्या या चार सामन्यांपैकी तीन सामने कमी धावसंख्येचे झाले. युटोपियन विरुद्ध लोकमंगल ॲग्रो सामन्यात शतकी धावसंख्या पार झाली. विनोद चौगुले, आरिफ काझी, संजय चव्हाण, राजू कोळी यांनी सामनावीरचा पुरस्कार पटकावला. जकराया शुगर विरुद्ध श्री शंकर सहकारी संघादरम्यान पहिला सामना झाला. शंकर सहकारी संघाने ८ षटकांमध्ये ७० धावांचे आव्हान जकराया संघाला दिले. प्रत्युत्तरात कराया संघाने विनोद चौगुलेच्या १९ चेंडूत फटकावलेल्या नाबाद ३३ धावांच्या बळावर ७ षटकांतच सामन्यात विजय प्राप्त केला.
युटोपियन शुगर विरुद्ध लोकमंगल ॲग्रो यांच्यातील सामन्यात युटोपियन संघाने ८ षटकांत १०६ धावा केल्या. १०७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या लोकमंगल ॲग्रो संघाला केवळ ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली. युटोपियन संघाने ३२ धावांनी हा सामना जिंकला. बाबारावजी शिंदे शुगर विरुद्ध सिद्धेश्वर शुगर संघादरम्यान झालेल्या चौथ्या सामन्यात बाबारावजी शिंदे शुगर संघ फलंदाजीत ढेपाळला. ८ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात ५४ धावाच शिंदेशुगर संघाला करता आल्या. सिद्धेश्वर संघाने ६ षटकांतच ५५ धावा करत सामना जिंकला. ओंकार शुगर कॉर्पोरेशन्सविरुद्ध सिद्धनाथ शुगर संघादरम्यान झालेल्या सामन्यात सिद्धनाथ शुगर संघाने ४७ धावांपर्यंतच मजल मारली. ओंकार शुगर संघाने अवघ्या २.५ षटकांतच ५० धावा करत सामना खिशात घातला.