अहिल्यानगर : २० ऑगस्टपर्यंत थकीत ऊस बिले देण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

अहिल्यानगर : सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे पैसे न मिळाल्याने बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले. शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले व्याजासह एकरकमी मिळावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे आदींनी केली. लवांडे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चाललेल्या आंदोलनानंतर तहसीलदार आकारा दहाडदे यांनी दि. २० ऑगष्टपर्यत सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट अदा करण्यात येईल, अशी लेखी हमी दिली आहे. त्यामुळे २० ऑगष्टपर्यंत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आपल्याच उसाच्या गाळपाचे हक्काचे पैसे आपल्या अडचणीच्या वेळी मिळत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कऱ्हेटाकळीच्या तात्यासाहेब गायके या शेतकऱ्याच्या भावना अनावर झाल्या. केदारेश्वरला ऊस घातल्याच्या संतप्त भावना त्याने स्वतः चे तोंड झोडत, मोठ्याने आक्रोश करत व्यक्त केल्या. तहसीलदार दहाडदे यांनी कारखान्याशी संपर्क साधला. सकाळी ११ ला तहसील प्रांगणात मोठ्या संख्येने एकत्रित आलेले शेतकरी तब्बल तीन वाजेपर्यंत चार तास आंदोलन करत होते. कारखान्याचे संचालक, अधिकारी व प्रशासकीय पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगडे, माऊली मुळे, चंद्रकांत झारगड, मेजर अशोक भोसले, मच्छिंद्र आरले, अमोल देवडे, नाना कातकड, अंबादास भागवत, मच्छिंद्र डाके, अभिमन्यू दास, फारुक लहानु हसन, एकनाथ गायके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here