सोलापूर : माढा तालुक्यातील संत कुर्मदास साखर कारखान्याला तुंगत, फुलचिंचोली, तारापूर या भागातील शेतकऱ्यांनी मागील हंगामात ऊस पुरवठा केला होता. काही शेतकऱ्यांना अर्धवट रक्कम मिळाली आहे तर काहींना एक रुपयाही मिळाला नाही. शेतकरी दिवस-दिवस कारखाना स्थळावर थांबत आहेत. मात्र, पैसे काही मिळत नाहीत. काही शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी चेक दिले. मात्र, ते बाऊन्स झाले आहेत. ही फसवणूक असल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी केली. याबाबत त्यांनी साखर सहसंचालकांना पत्र दिले आहेत.
विजय रणदिवे यांनी उसाचे पैसे जमा न करता १०० टक्के एफआरपी दिल्याची खोटी माहिती दिलेल्या संत कुर्मदास साखर कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत एका शेतकऱ्याला अनुभव रणदिवे यांनी सांगितला आहे. त्या शेतकऱ्याचा ४८ टन ऊस संत कुर्मदास साखर कारखान्याला गेला. ऊस बिलासाठी अधिकाऱ्यांना सतत फोन केल्यावर वेळ मारून नेली जाते. नंतर एक महिन्याची पुढची तारीख टाकून २ जून रोजी चेक दिला होता. तो बाऊन्स झाला. आता कारखान्याचे अधिकारी चेक आमच्याकडे जमा करा, पैसे आरटीजीएस करतो असे म्हणतात. आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाहीत असे शेतकरी सांगतात असे रणदिवे म्हणाले. त्यावर साखर सहसंचालक सुनील शिरापूरकर यांनी संत कुर्मदास कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन याचा खुलासा विचारला आहे.