नाशिक: निफाड साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून, कारखान्याच्या मालमत्ता विक्रीला विरोध करत शेतकऱ्यांनी निदर्शने केली. जिल्हा बँकेने निफाड साखर कारखाना विक्रीचा डाव आखला आहे. जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये व सभासदांच्या ठेवी मिळत नाहीत, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, असा इशारा कारखाना कार्यस्थळावरील बैठकीत देण्यात आला. कारखान्याच्या गेटवर कामगार व सभासदांनी आंदोलन केले.
यावेळी झालेल्या बैठकीत सरचिटणीस बी. जी. पाटील यांनी जिल्हा बँकेला कारखाना विक्री करू न देण्याचा निर्धार व्यक्त केला. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके- पाटील, लहू मोरे, नानासाहेब दाते, गोकूळ झाल्टे, अमित ताजणे, सोमनाथ झाल्टे यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. तर माजी आमदार अनिल कदम यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत सभासद व कामगारांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. हा कारखाना शेतकरी, सभासद व कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे, त्याला गिळंकृत होऊ देणार नाही असा इशाराही कामगार व सभासदांनी या वेळी दिला. माजी सरपंच तानाजी पुरकर, खंडू बोडके पाटील, बाळासाहेब बागस्कर, सुभाष जोमन, विजय रसाळ, विष्णुपंत मत्सगार, पुंडलिक ताजणे, शिवाजी मोरे, नितीन निकम, सचिन विजय रसाळ उपस्थित होते.