सातारा : तीन महिन्यांनी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होणार आहेत. गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणीसाठी मशीनचा वापर केला जात आहे. मात्र असे असले तरी ऊस वाहतूकदार विशेषतः ट्रॅक्टर मालकांची ऊस तोडणी मजुरांकडून यापूर्वी झालेल्या लाखो रुपयांच्या फसवणुकीतून अनेक ट्रॅक्टर मालक अजूनही सावरलेले नाहीत. काही ट्रॅक्टर मालकांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केल्या आहेत. मात्र पोलिसांकडून अद्यापही संशयितांचा शोध घेण्यात आला नसून आता ट्रॅक्टर मालकांचे पैसे परत मिळण्याची आशा धूसर होत चालली आहे.
सातारा जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी बीडसह परजिल्ह्यातील मजूर मोठ्या संख्येने येतात. कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ट्रॅक्टर मालकांना कारखाना व्यवस्थापनाकडून व्याजाने काही रक्कम उचल स्वरुपात दिली जाते. याच पैशाचा वापर करून ट्रॅक्टर मालक टोळी प्रमुखांशी अथवा ऊसतोड मजुरांशी करार बनतात आणि त्यानंतर संबंधितांना अॅडव्हान्स रकम दिली जाते. मात्र ही अॅडव्हान्स रक्कम घेतल्यानंतर अनेक टोळी प्रमुख गायब होतात. कराड तालुक्यात मागील तीन ते चार वर्षात अनेक ट्रॅक्टर मालकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. ऊस तोडणी कामगारांच्या फसवणुकीमुळे अनेक ट्रॅक्टर मालक अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. फसवणूक करणाऱ्या मुकादम आणि मजुरांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.