अहिल्यानगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याने अमृत महोत्सवी वर्षांमध्ये कार्यक्षेत्रातील प्रति एकरी ऊस उत्पादन ‘वाढीसाठी ‘अमृत कलश’ ही प्रोत्साहनपर योजना राबविण्याचे धोरण हाती घेतले आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना आणली आहे. सध्याच्या ऊस उत्पादन क्षमतेपेक्षा प्रती एकर १५ ते २० मेट्रिक टन किंवा त्यापेक्षाही वाढीव उसाचे उत्पादन घेण्यासाठी निविष्ठायुक्त किट कारखान्यामार्फत खरेदी करून त्याचा पुरवठा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना केला जात आहे. तर गळीत हंगाम २०२६ २७ करिता एक नोव्हेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत टिपरी लागवड योजना राबविली जाणार आहे. त्या अंतर्गत एकरी सहा हजार उसाची रोपे लागवडीसाठी शेतापर्यंत पोहोच करण्यात येतील.
कारखान्याने जारी केलेली प्रति एकरी ५००० रुपये अनुदान योजना नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी असेल. यामध्ये ऊस बेणे टिपरीद्वारे ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकरी ५००० रुपया प्रमाणे कारखान्यामार्फत अनुदान देण्यात येईल. या योजनेअंतर्गत असणारी ऊस लागवड ही कमीत कमी साडेचार फूट रुंद सरीची असावी. ही योजना किमान २० गुंठे व त्यापेक्षा जास्त क्षेत्राकरिता आहे. कारखान्याच्या ऊस रोपे लागवड योजनेतील ऊस पीक अनुदान योजनेस पात्र ठरणार नाही. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन प्रति एकरी ३५ मेट्रिक टनांपेक्षा जास्त आले पाहिजे. दोन्ही योजनांसाठी ऊस लागवडीपूर्वी संबंधित क्षेत्राचे माती परीक्षण करून घेणे सक्तीचे आहे. तसेच या क्षेत्राची सबसॉयलर यंत्राद्वारे मशागत करून घेण्याची अट घालण्यात आली आहे. योजनेत सहभागासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कारखान्याच्या विभागीय शेतकी गट ऑफिसशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.