सातारा: येथील अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कारखान्याचे अध्यक्ष यशवंतराव साळुंखे, माजी अध्यक्ष सर्जेराव सावंत, रामभाऊ जगदाळे, सत्यपाल फडतरे, संचालक, अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस नर्सरी द्वारे बियाण्यांचा पुरवठा व विविध ऊस विकास योजना राबविल्या जात असल्याचे सांगितले.
यावेळी बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे डॉ. विवेक भोईटे म्हणाले, बारामती ट्रस्टने पाच वर्षांच्या ऊस उत्पादनावर सकारात्मक संशोधनातून एआय तंत्रज्ञानाचा परिणाम होत असल्याचे सिद्ध केले. ऊस पिकाचे उत्पादन वाढवून शेतकरी व साखर कारखान्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ३० टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ शक्य आहे. या तंत्रज्ञानाचा प्रतिहेक्टरी खर्च सुमारे २५ हजार रुपये असून, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राज्य शासन, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि साखर कारखाने अनुदान देणार आहेत. शेतकऱ्यांनीही आपला हिस्सा भरून सहभाग घ्यावा. यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पीक उत्पादन व संरक्षण विभागप्रमुख डॉ. अशोक कडलग यांनी मार्गदर्शन केले. रणजित चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास शेडगे यांनी आभार मानले.