अहिल्यानगर : माळेगाव दुमाला (ता. नेवासे) येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या द्वितीय ऊस गळीत हंगामाकरिता आज माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत रोलर पूजन कार्यक्रम उत्साहात झाला. परिसरातील शेतकरी नानासाहेब लंघे यांच्या हस्ते सपत्नीक यंत्राची पूजा करण्यात आली.
कारखान्याच्या कार्यकारी संचालक डॉ. ममता लांडे-शिवतारे यांनी प्रास्ताविक भाषणात यंदाच्या वर्षी सहा लाख टन गळिताचे उद्दिष्ट असल्याचे सांगून शेतकरी हित व त्यांच्या प्रश्नाला अग्रक्रम देताना त्यांचा विश्वास सार्थ ठरविला जाईल, असे सांगितले. माजी मंत्री शिवतारे यांनी यंदाच्या हंगामाचे नियोजन पूर्ण झाल्याचे सांगितले. मुख्य व्यवस्थापक एल. बी. गाढे, शेतकी अधिकारी राजेंद्र काळे, लेखापाल एस. बी. पागिरे, शशिकांत बडवे, हनुमंत ताकवणे, शशिकांत धावडे व कार्यक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. वरखेड येथील प्रशांत भालेराव यांनी रोलर पूजनाचे पौरोहित्य केले.