पाकिस्तान: PSMA कडील चुकीच्या आकडेवारीमुळे ७५०,००० टन साखर निर्यात झाल्याचा CCP चा दावा

इस्लामाबाद : साखर सल्लागार मंडळाच्या (PSMA) चुकीच्या माहितीमुळे साखर निर्यातीचा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानच्या स्पर्धा आयोगाने (CCP) म्हटले आहे. यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्यांनी PSMA वर खापर फोडले आहे. अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, CCP च्या अध्यक्षांनी खुलासा केला की, जून ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (PSMA) ने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे ७५०,००० मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात आली.

ऊस उत्पादन, उपलब्ध साठा आणि साखर उत्पादन अंदाज यांवरील चुकीच्या आकडेवारीमुळे स्थानिक बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला. निर्यातीतून देशाला ४०३ दशलक्ष डॉलर्स मिळाले. ही रक्कम ११२ अब्ज रुपये इतकी होती. परंतु यामुळे साखर टंचाई निर्माण होऊन पाकिस्तानी जनतेला अंदाजे ३०० अब्ज रुपये खर्च करावा लागला. मंत्री औरंगजेब यांनी साखर क्षेत्र पूर्णपणे नियंत्रणमुक्त करण्याची घोषणा केली. त्यामुळे सीसीपीची भूमिका वाढली. त्यांनी इतर संस्थांना चौकशीत मदत करण्यासाठी संबंधित डेटा प्रदान करण्याचे निर्देश देखील दिले.

सद्यस्थितीत उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. राष्ट्रीय सभेच्या वाणिज्य स्थायी समितीच्या उपसमितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की १५ नोव्हेंबरपूर्वी बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जाऊ शकते. त्यांनी समितीला माहिती दिली की १५ नोव्हेंबरपर्यंत सध्याचा १७ लाख टनांचा साठा पुरेसा आहे. नोव्हेंबर २०२५ पर्यंत साखर आयात करण्याची आवश्यकता नाही असे दिसते. तथापि, घाऊक विक्रेत्यांसह बाजारातील शक्ती किमती वाढवण्यासाठी पुरवठ्यात फेरफार करू शकतात.

गेल्या आर्थिक वर्षात ४२० दशलक्ष डॉलर्स (११२ अब्ज रुपये) किमतीची साखर निर्यात करण्यात आली होती आणि निर्यातीपूर्वी किरकोळ साखरेचे दर १२५ ते १३० रुपये प्रति किलो दरम्यान होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले. समितीचे संयोजक आतिफ खान यांनी प्रश्न उपस्थित केला की, नंतर किमती २०० रुपये प्रति किलोपर्यंत का वाढल्या. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांशी असे मान्य झाले होते की किमती १४० रुपयांपेक्षा जास्त होणार नाहीत. यावर संयोजकांनी सांगितले की, निर्यातीनंतर किमतीत वाढ झाल्याचे संकेत आहेत. ते पुढे म्हणाले की, साखर निर्यात थांबल्यानंतर बाजारात किमती वाढल्या आणि सध्याची सरासरी किंमत १७९ रुपये प्रति किलो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here