पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी ८५४ लाख ९७ हजार मेट्रिक टनाइतके ऊस गाळप केले. त्यापोटी देय एफआरपीची रक्कम ३१ हजार ६०२ रुपये होती. ‘दैनिक पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सद्य:स्थितीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कारखान्यांनी ऊस तोडणी वाहतूक खर्चासह ३१ हजार २१५ कोटी रुपये जमा केलेले असून देय रकमेच्या ९८.७८ टक्क्याइतकी रक्कम देण्यात आली आहे. हंगामात २०० पैकी १३६ साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. तर उसाच्या एफआरपीचे ३८७ कोटी रुपये अद्याप देणे बाकी आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, एफआरपीची अधिक रक्कम थकीत असलेल्या कारखान्यांच्या जुलै महिन्यात सुनावण्या घेण्यात आल्या. शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवलेल्या २८ साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीची कारवाई करण्यात आली. एकूण ६४ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची ३८७ कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम देणे बाकी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. साखर कारखान्यांकडून संपलेल्या ऊस गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी दिली जावी यासाठी साखर आयुक्तालयाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.