नाशिक : निफाड साखर कारखाना वाचविण्यासाठी खासदार संजय राऊत यांना साकडे

नाशिक : जिल्हा बँकेने निफाड सहकारी साखर कारखान्याची जमीन विक्री व कारखाना विक्रीचा घाट घातला आहे. मात्र हा कारखाना वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखालील कामगारांच्या मुलांच्या शिष्टमंडळाने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना केली. खासदार राऊत यांनीही कारखान्याबाबत सर्व बाबी जाणून घेतल्या. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगत सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नाशिक येथे शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, निसाका कामगारांची मुले किरण वाघ, योगेश आढाव, नितीन निकम यांनी राऊत यांची भेट घेतली.

दरम्यान, निसाका भाडेकराराने देऊन तीन हंगाम उलटूनही सुरू करण्यात आला नाही. सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून निफाड साखर कारखान्याची उर्वरित जमीन व इतर मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सभासद व कामगार संघटनेने त्याविरोधात लढा पुकारला आहे. या लढ्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. सोमवारी सकाळी साडेनऊला निसाका कार्यस्थळावर सर्वपक्षीय सभासद, कार्यकर्ते व कामगारांची बैठक होणार आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. निसाका विक्रीचा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार अनिल कदम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here