लातूर : शेतकरी सहकारी साखर कारखान्यात आगामी गळीत हंगाम २०२५-२६ साठी मिल रोलरचे पूजन माढाचे आमदार तथा पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार तथा चेअरमन अभिमन्यू पवार, सतीश भोसले गुरुजी, प्रवीण फडणवीस, सभापती शेखर सोनवणे, सुभाष जाधव, संतोष बेंबडे, काका मोरे, शरद भोसले, डी. एल. पतंगे यांची उपस्थिती होती. किल्लारी साखर कारखान्याचा संबंध थेट शेतकऱ्यांच्या चुलीशी आहे. येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणूनच हा कारखाना सुरू केला, असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
यावेळी आमदार अभिजित पाटील म्हणाले की, ज्या साखर कारखान्यात ऊस टोळी चालवली, त्याच कारखान्याचा आज मी चेअरमन आहे. कारखान्याला तहान-भूक, घर, झोप विसरून वेळ दिला. त्यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. पहिल्या वर्षी दोन लाख टन ऊस गाळप केले. दोन वर्षांत तीन कारखाने घेतले. पाच वर्षात पाच कारखाने चालवले. सर्वच कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढवली आहे. यंदाही कुठलाही ऊस शिल्लक राहणार नाही. किल्लारी कारखान्याने सर्वात आधी गाळप सुरू करावे. या भागातील उसाला चांगली रिकव्हरी असल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालेल. सर्व ते सहकार्य केले जाईल. यावेळी प्रवीण फडणवीस यांनी प्रास्ताविक केले. तुकाराम पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शेतकरी, कामगार, ग्रामस्थ उपस्थित होते.