पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी, दि. १६ रोजी झाली. यावेळी कारखान्याच्या टाइम ऑफिसद्वारे झालेल्या ५४ लाख ४९ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी खात्यांतर्गत चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला. अपहारास जबाबदार असलेला कामगार रुपचंद साळुंखे व कामगार अधिकारी दीपक निंबाळकर या दोघांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. तर, या गैरव्यवहार प्रकरणात विलास निकम, दीपक भोसले, सुरेश होळकर, श्री. बनकर या चारही कामगारांचा अपहारात कुठलाही सहभाग आढळून न आल्याने पुन्हा सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमेश्वर कारखान्याच्या टाइम ऑफीसद्वारे गैरहजर कंत्राटी कामगारांना हजर दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार मार्च २०२५ मध्ये उजेडात आला होता. संचालक मंडळाने द्विस्तरीय चौकशी करत टाइम ऑफिसमधील सहाजण आणि एक कंत्राटदाराला निलंबित केले होते. साखर आयुक्तांच्या पॅनेलवरील मेहता – शहा चार्टर्ड अकौंटंट कंपनीने डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०२५ अशा आठ वर्षांतील टाइम ऑफिसच्या कामकाजाची तपासणी केली. यात ५४ लाख २९ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निश्चित झाले. चौकशी समितीने अपहारास रूपचंद साळुंखे आणि कर्तव्यात कसूर करण्यात दीपक निंबाळकर यांना जबाबदार ठरविले. अन्य चार कामगार व कंत्राटदार अपहारास थेट जबाबदार नसल्याचा निष्कर्ष काढला होता. चौकशी समितीने साळुंखे याच्या ठेकेदाराच्या खात्यामार्फत टप्प्याटप्प्याने अपहाराची सर्व रक्कम कारखान्याच्या खात्यावर भरून घेण्यात यश मिळविले. त्यानंतर खात्यांतर्गत चौकशीसाठी अॅड. मंगेश चव्हाण यांची समिती नेमण्यात आली होती. यावेळी कारखान्याचे प्रतिनिधी अॅड. मिलिंद पवार हेही उपस्थित होते. जबाबदार लोकांवर कायदेशीर कारवाईबाबत पॅनेलवरील विधिज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णयही घेतल्याचे यादव यांनी सांगितले.