नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या विक्रीला आमचा तीव्र विरोध आहे. कारखाना वाचविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मात्र कारखाना कदापि विक्री करू दिला जाणार नाही, असा ठराव भाऊसाहेबनगर येथील कामगार आणि शेतकरी सभासदांच्या सभेत करण्यात आला. भाऊसाहेबनगर येथील निसाका कार्यस्थळावरील मुख्य प्रवेशद्वारावर सोमवारी (ता. १८) निसाका कामगार आणि शेतकरी सभासद आणि सर्वपक्षीय नेत्यांची संघर्ष सभा झाली.
या सभेत कारखाना भाडेतत्त्वावर दिलेल्या कालावधीतील व्यवहारांची जिल्हा बँक आणि संबंधित ठेकेदार, भाडेपट्टा कराराची पुनर्रचना करावी, अशी मागणी करण्यात आली. पुढील आठवड्यात निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणे, कारखाना विक्रीला विरोध, भाडेपट्टा कराराचा पुनर्विचार करून पुनर्रचना करावी, यंत्रसामग्रीची झालेली विक्री याची चौकशी करून वसुली करावी, असे ठराव मंजूर झाले. जिल्हा बँकेने निफाड साखर कारखान्याची उर्वरित जमीन व अन्य मालमत्ता तातडीने विक्री करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याविरोधात कामगार आणि शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
सभेत कामगार सभेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख यांनी प्रास्ताविक केले. शिवाजीराजे ढेपले, दिलीप मोरे, धोंडिराम रायते, हर्षल मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार अनिल कदम यांनी यापूर्वीही प्रत्येक पातळीवर मी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. निसाका वाचावा याकरिता मी कार्यकर्ता आणि सभासद म्हणून लढ्यात अग्रभागी राहीन असे सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल, शिवसेना (उबाठा)चे निफाड तालुकाध्यक्ष खंडू बोडके यांची भाषणे झाली. कामगार सभेचे सरचिटणीस बी. जी. पाटील यांनी आभार मानले.