मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. संबंधीत यंत्रणेला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला. घरांचे नुकसान, माणसे, जनावरांचे मृत्यू याबाबत नुकसानभरपाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थितीत मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरू आहे. सुमारे एक हजार गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. खानदेशात पिकांसह अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. मुंबईत सखल भागांत पाणी साठले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस यांनी अलमट्टी धरणातील पाण्याचा योग्य विसर्ग करण्याबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा केली.
नांदेड विभागात २०६ मिमी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफसोबत आता सैन्यदलाला देखील मदतीसाठी पाचारण केले आहे. रत्नागिरीला पावसाचा जोरदार तडाखा बसला असून सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत झाले आहे. खानदेशात पिकांची मोठी हानी झाली आहे. दोन दिवसांपासून जळगाव, नंदूरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाँधार पावसाने नदी-नाल्यांना पूरस्थिती उद्भवली असून शेती पिकांसह अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे आणि तेथील लोकांना जेवणासह पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.