पुणे : राज्यातील साखर उद्योगाबाबत विचारमंथन करण्यासाठी राज्यस्तरीय साखर उद्योग परिषदेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ ऑगस्ट रोजी ही परिषद होईल. यामध्ये नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. “साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा” या विषयावर परिषदेत सखोल चर्चा होईल. साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. तर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी असतील.
चर्चासत्रांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, विस्मा व नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, ‘विस्मा’चे सचिव व अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे डॉ. पांडुरंग राऊत, सहकारी निवडणूक आयुक्त अनिल कवडे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.
परिषदेस उपस्थित राहाणाऱ्या प्रमुख पाहुण्यांमध्ये राज्य सहकारी बँकेचे प्रशासक प्रा. विद्याधर अनास्कर, विस्मा व नॅचरल शुगर लिमिटेडचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक तथा माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय परिषदेत अधिकाअधिक साखर कारखाना प्रतिनिधींनी सहभागी व्हावे आणि त्यासाठी २५ ऑगस्टपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, डॉ. रविंद्र शिगणापूरकर आणि प्रा. (डॉ.) अनिल कारंजकर यांनी केले आहे.