कोल्हापूर : शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून श्री गुरुदत्त शुगर्सने पारदर्शीपणे व स्वच्छ कारभार केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात कारखाना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. शेतकरी व कामगार ही कारखान्यांनी दोन महत्त्वाची चाके असून त्यांच्या पाठबळावर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी व्यक्त केले.
टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर किसान कार्ड योजनेतील शेतकरी यांना वैद्यकीयकामी धनादेश प्रदान, तसेच कारखान्याचे मयत कामगार व ऊस तोडणी मजूर यांच्या वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चेअरमन घाटगे बोलत होते. घाटगे म्हणाले, २०१७-१८ या वर्षीच्या गळीत हंगामापासून किसान कार्ड ही योजना सुरू केली आहे. या योजनेत ९ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या उपक्रमामुळे श्री गुरुदत्त शुगर्सची विश्वासार्हता अधिक दृढ होऊन कारखाना व शेतकरी यांचे ऋणानुबंध आणखी घट्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे, संचालक शिवाजीराव माने-देशमुख, शिवाजी सांगले, अण्णासाहेब पवार, धोंडीराम नागणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, संभाजी भोसले, पोपट पुजारी, मुकुंद पुजारी, सदाशिव आंबी, अन्वर जमादार, सुरेश सासणे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
… अशी मिळाली मदत
श्री गुरुदत्त शुगर्स किसान कार्ड योजनेतून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना विविध आजार शस्त्रक्रिया व उपचारासाठी यावेळी १७ शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांचे धनादेश, कारखान्यामध्ये काम करणारे २ मयत कर्मचारी यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख, तर ऊस तोडणी करणाऱ्या मयत मजुरांच्या वारसांना ३ लाख रुपयांचा धनादेश कारखान्याच्या वतीने देण्यात आला.