कोल्हापूर : किसान सभेची गुरुवारी राज्यव्यापी ऊस परिषद, प्रतिटन ५,००० रुपये दराची मागणी

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन एकरकमी पाच हजार रुपये दर द्या, रिकव्हरीचा बेस पूर्वीप्रमाणे ९.५ टक्के करा, दुय्यम उपपदार्थातील उत्पन्नाचा वाटा शेतकऱ्यांना द्या यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा प्रणित ऊस उत्पादक महासंघाच्यावतीने गुरुवारी (दि. २१ ऑगस्ट) राजर्षि शाहू स्मारक भवनात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता ही परिषद सुरू होईल. किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. उदय नारकर यांनी येथे पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ऊस परिषदेचे स्वागताध्यक्ष भाई बाबासाहेब देवकर तसेच प्राचार्य ए. बी. पाटील, प्रा. सुभाष जाधव, ॲड.अमोल नाईक यांनीही ऊस परिषदेची भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

परिषदेसाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रीय सचिव विजू कृष्णन, अखिल भारतीय ऊस उत्पादक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तामिळनाडूचे डी रवींद्रन, किसान सभा राज्य सचिव डॉ. अजित नवले, उमेश देशमुख उपस्थित राहणार आहेत. साखरेसाठी घरगुती व औद्योगिक अशी दुहेरी दर प्रणाली सुरू करा, साखरेची किमान विक्री किंमत ४५ रुपये प्रति किलो करा, तोडणी वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीला पायबंद घाला, क्रमपाळीनुसार ऊस तोडून एक सप्टेंबरपूर्वी गावागावांत सार्वजनिक ठिकाणी क्रमपाळी प्रसिद्ध करा, वजन काट्यांमध्ये पारदर्शकता आणा अशा प्रमुख मागण्या आहेत. परिषदेस किसान सभा व ऊस उत्पादक महासंघाचे राज्यस्तरीय व राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला लक्ष्मण पाच्छापुरे, चंद्रकांत कुरणे, युवराज भोसले, बाबासाहेब खाडे, चव्हाण, विवेकानंद गोडसे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here