कर्नाटक : शिरोळच्या दत्त कारखान्यातर्फे ऊस उत्पादन वाढीसाठी पीक चर्चासत्र

बेळगाव : शिरोळमधील दत्त कारखान्यातर्फे शेडबाळ (ता. कागवाड) येथील बसवेश्वर देवस्थानाच्या सभागृहात ऊस पीक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्त कारखान्याचे माजी अध्यक्ष व क्षारपड मुक्ती चळवळीचे जनक गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य प्रमाणात पाणी, खत, माती परीक्षण, रोपसंख्या व कीड नियंत्रण या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्त कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, संचालक अमर यादव, ज्योतीकुमार पाटील, कृषी विज्ञान केंद्र- तळसंदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप उपस्थित होते.

गणपतराव पाटील यांनी, शेती व्यवसायात भरीव प्रगतीसह ऊस पिकाबद्दल संशोधन झाले आहे; मात्र अद्यापही ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जास्त उत्पादन वाढीसाठी जास्त रासायनिक खते व पाण्याचा वापर करत आहेत. त्यामुळे सुपीकता कमी होत असून सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने जमीन क्षारपड बनत आहे. हे टाळण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शास्त्रज्ञ डॉ. जयवंत जगताप यांनी दत्त कारखान्याने केलेल्या क्षारपडमुक्तीच्या संशोधनाची माहिती दिली. कीडनाशक व हुमणी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. साखर कारखान्याचे अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ए. एस. पाटील, अमर चौगुले, नेमगौड अदुरे, अण्णा अरवाडे, अनिल कुडचे, सूरगौड पाटील, अजित नरसगौडर, कुंतीनाथ मालगावे, प्रकाश जोयगौडर, चंद्रकांत जाधव, रमेश बाडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here