कोल्हापूर : ऊस उत्पादक ‘हुमणी’, सोयाबीन उत्पादक ‘केसाळ’ अळीने हैराण

कोल्हापूर : ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यांत पावसाने उघडीप दिल्याने किडीला पोषक अशा वातावरणाचा फटका खरीप पिकाला बसला आहे. सोयाबीन, भुईमुगावर ‘केसाळ’ अळीचा सुमारे १५ हजार हेक्टरवर प्रादुर्भाव झाला असून ऊस उत्पादकांना ‘हुमणी’ किडीने हैराण केले आहे. जिल्ह्यातील ५० हजार हेक्टरवरील पिकांना किडीने ग्रासले आहे. जिल्ह्याचे १ लाख ८० हजार ७४७हेक्टर खरिपाचे पेर क्षेत्र आहे. पण, यंदा मे महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाच्या उघडझापमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. ऑगस्टच्या मध्यापर्यंत १ लाख ६६ हजार ६८६ हेक्टरवर (९२.२२ टक्के) पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी आणि कडधान्याचा पेरा यंदा तुलनेत कमी झाला आहे.

पेरण्या व्यवस्थित न झाल्याने पिकांची उगवण आणि वाढ चांगल्या प्रकारे झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात, ऑगस्ट महिन्यातील पहिले दोन आठवडे पावसाने उसंत घेतली आणि किडीला पोषक असेच वातावरण तयार झाले. त्याचा फटका खरीप पिकांना बसला आहे. सोयाबीन आणि भुईमूग पिकावर ‘केसाळ’ अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्याचबरोबर ‘हुमणी’ किडीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी सुरू झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. हा पाऊस किडीला अटकाव करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग, उसाच्या पानावरील कीड धुऊन जाण्यास मदत होईलच, त्याचबरोबर सरीत पाणी साचल्याने हुमणी किडीची वाढ रोखण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here