महाराष्ट्रात पुढील हंगामात ११८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन शक्य : ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे

पुणे : महाराष्ट्रात आगामी हंगाम २०२५-२६ मध्ये सुमारे बाराशे लाख मेट्रिक टन ऊस गाळप अपेक्षित आहे. तर साखरेचे १३० लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यातील सुमारे १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविल्यास प्रत्यक्षात साखर उत्पादन ११८ लाख टन इतके उच्चांकी होईल, असा अंदाज वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने धान्यापासून इथेनॉल उत्पादनास चालना दिली असल्याचे नमूद करुन ते म्हणाले, बिहारमध्ये मका तर पंजाब-हरियाणामध्ये भाताचे उत्पादन जास्त होते. अशा मका आणि तांदूळ उत्पादनात अग्रेसर राज्यांना ही संधी आहे. विदर्भ-मराठवाड्यात ऊसासह सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. सोयाबीनला हमीभावाइतके सुद्धा दर मिळत नाहीत. मात्र, मक्याचा प्रति किंवटलचा दर १७०० ते १८०० रुपयांवरुन २४०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे मक्यासाठी मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही पोषक स्थिती आहे.

ते म्हणाले, मक्याचा दर २२०० ते २४०० रुपयांपर्यंत राहिला तरच कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या मक्यापासून इथेनॉल तयार करणे परवडेल. ज्याद्वारे ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर इतर वेळी सहा महिन्यात कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन सुरू ठेवता येणे शक्य आहे. साखर संकुलमधील ‘विस्मा’च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस ‘विस्मा’चे पांडुरंग राऊत, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी उपस्थित होते.

‘नॅचरल शुगर’मध्ये धान्यापासून इथेनॉलचा पहिला प्रकल्प

राज्यातील धान्यापासूनचा इथेनॉल निर्मितीचा प्रतिदिन शंभर किलोलीटरचा प्रकल्प लातूरमधील ‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिज’ या खासगी कारखान्यात सुरू करीत असल्याचे नमूद करून ठोंबरे म्हणाले, देशात धान्यांपासून इथेनॉल उत्पादन तयार करणारे २६५ आसवणी प्रकल्प (डिस्टलरीज) कार्यरत आहेत. त्यांच्याकडून इंधन कंपन्यांना ६० टक्के इथेनॉल पुरवठा होतो, तर ४० टक्के पुरवठा साखर कारखाने करतात. धान्यापासून इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पात नवीन मशिनरी टाकण्यासाठी अतिरिक्त २५ टक्के खर्च येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here