कोल्हापूर : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) १८ कोटी ८ लाख ९५ हजार रुपये मुद्दल व त्यावरील व्याज मिळून सुमारे ४५ कोटी थकीत रकमेसाठी हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीला काढली आहे. ९ ऑक्टोबर रोजी ई-लिलाव पद्धतीने विक्री करणार असल्याचे नोटीशीत म्हटले आहे. हा कारखाना सध्या अथर्व इंटरट्रेड कंपनीकडे भाडेतत्त्वावर चालवायला दिलेला आहे. या नोटिशीबाबत ही कंपनी व ‘दौलत’चे संचालक मंडळ काय निर्णय घेते, यावर कारखान्याची विक्री होणार की तो सभासदांच्याच मालकीचा राहणार, हे ठरणार आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने बँकेची मालमत्ता ताब्यात घेतल्याची नोटीस चिकटवली होती. त्यानंतर आता एनसीडीसी प्रशासनाने कारखाना विक्रीची नोटीस कारखान्याच्या भिंतीवर चिकटवली आहे.
मधल्या काळात आर्थिक अरिष्टात आलेला कारखाना सुमारे पाच वर्षे बंद अवस्थेत होता. २०१९ साली जिल्हा बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन तो भाडेतत्त्वावर चालवायला दिला. कोल्हापूर येथील अथर्व कंपनीने १६२ कोटींच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारून ३९ वर्षांच्या कराराने हा कारखाना भाडे तत्त्वावर चालवायला घेतला. मात्र, एनसीडीसीने आपल्या कर्जासाठी पुन्हा कारखान्याच्या मालमत्तेवर दावा करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कारखाना बंद पडण्याची चिन्हे आहेत. एनसीडीसीने कारखान्याच्या जागेचे मूल्यांकन सुमारे ८६ कोटी, तर यंत्रसामुग्रीचे मूल्यांकन ५१ कोटी १० लाख रुपये केले आहे. बोलीसाठी त्याच्या दहा टक्के अनामत रक्कम भरावी लागणार आहे.