परभणी : सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र व आडमपूरच्या लक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय तांत्रिक कार्यशाळा घेण्यात आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. आमदार व कार्यकारी परिषद सदस्य डॉ. राहुल पाटील हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळा शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी ठरतात. प्रशिक्षणार्थ्यांनी येथे घेतलेले ज्ञान शेतीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी वापरावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
आमदार डॉ. राहुल पाटील यांनी विद्यापीठाच्या ज्ञानाचा उपयोग करून ऊस उत्पादकता वाढविण्यावर भर दिला. त्यांनी उपस्थित प्रक्षेत्र अधिकाऱ्यांना आपल्या ज्ञानात अधिक भर घालण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, लक्ष्मी नृसिंह शुगर वरिष्ठ संचालक नचि जाधव, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. गजानन गडदे, सुभाष सोलव, तुळशीरामजी अंभोरे, समर्थ कारेगावकर, नवनाथ कऱ्हाळे व विनायक पवार आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनात कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या कार्यशाळेत लक्ष्मी नृसिंह शुगर्स, अमडापूर येथील ४७प्रक्षेत्र अधिकारी सहभागी झाले होते. डॉ. दिगंबर पटाईत यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिपाली सवंडकर यांनी आभार मानले.