कोल्हापूर : कोल्हापूर आणि परिसरातील जमिनीत तब्बल १८ लाख टनांपेक्षा अधिक कार्बन जमा आहे. जमिनीत जास्त सेंद्रिय कार्बन असल्यामुळे कोल्हापूरच्या मातीला नैसर्गिक खत मिळत असून शहरे व गावांतील प्रक्षणाचे प्रमाण घटण्याबरोबरच हवामान बदल रोखण्यासही हे घटक मदत करू शकतील. शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांनी ‘कूल फार्म टूल’ या साधनाचा वापर करून करण्यात आलेल्या संशोधनात जिल्ह्यातील उसाच्या शेतजमिनीतील मातीत कार्बन साठवता येऊ शकतो, हे समोर आले आहे. या अभ्यासात १५ वेगवेगळ्या ऊस शेतीच्या ठिकाणांवरून मातीचे ७५ नमुने घेण्यात आले. त्यांचे वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण केल्यानंतर, कोल्हापूर आणि परिसरातील जमिनीत तब्बल १८ लाख टनांपेक्षा अधिक कार्बन साठा आढळला आहे.
याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी सांगितले की, उसाच्या शेतजमिनीत कार्बन शोषून घेण्याची क्षमता आहे. मातीतील सेंद्रिय कार्बन (एसओसी) वाढवण्यासाठी योग्य शेती पद्धतींचा वापर गरजेचा आहे. मातीत शोषला गेलेला कार्बन ‘कूल फार्म टूल’ हे अधिक अचूकपणे मोजते. ज्या शेतजमिनीत सध्या कमी कार्बन आहे, अशा भागांत भविष्यात जास्त प्रमाणात कार्बन साठवण्याची मोठी क्षमता आहे. जास्त सेंद्रिय कार्बन असल्यामुळे मातीला नैसर्गिक खत मिळते. सेंद्रिय कार्बनमुळे मातीचे कण चिकटून राहतात, त्यामुळे माती भुसभुशीत राहते. कार्बनयुक्त माती जास्त पाणी शोषून ठेवू शकते. तसेच, जमिनीत सूक्ष्मजीवांची वाढ होते. हे सूक्ष्मजीव मातीला उपयुक्त पोषकद्रव्ये तयार करतात आणि पिकांची वाढ करतात.