पुणे : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले कि, साखर उद्योगासाठी सर्वात महत्वाचा असणारा कच्चा माल ऊस महाराष्ट्रामध्ये अलिकडील काळात मोठ्या प्रमाणात कमी उत्पादीत होत असल्याने साखर उद्योगासाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त ऊस पिकवला जातो. ऊस उत्पादनासाठी ठिबक सिंचन, नवनवीन तंत्रज्ञान जसे कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) चा वापर करून महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये जास्तीत जास्त ऊस कसे घेता येईल, यासाठी कारखान्यांनी प्रयत्न केले गेले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
चांगल्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी साखर आयुक्तालय प्रयत्नशील : आयुक्त
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) तर्फे आयोजित तांत्रिक परिषद, पारितोषिक वितरण समारंभात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ यांनी साखर उद्योगाची सध्याची स्थिती व भविष्यकालीन परिस्थितीचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, राज्यातील साखर उद्योगासाठी चांगल्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी साखर आयुक्तालय प्रयत्नशील आहे. सध्या त्याकरीता जैव व नवीन व नवीकरणीय उर्जेकरीता धोरण तयार केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत जुलै-२०२५ मध्ये झालेल्या बैठकीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, काही दिवसातच साखर आयुक्तालयाकडून उद्योगासाठी सक्षम धोरण राबविण्यासाठी सहकार मंत्रालयाकडे सादरीकरण करून त्यास अंतिम स्वरूप दिले जाईल.
गाळप हंगामाचा कालावधी वाढण्याची गरज : बी. बी. ठोंबरे
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, सध्या उसाचे क्षेत्र कमी होत असल्याने व हेक्टरी उत्पादन कमी मिळत असल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस येण्यासाठी राज्यातील सर्वच खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी वर्षभर शेतकऱ्यांसाठी कारखान्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. सध्या उपलब्ध असलेल्या उसाखालील क्षेत्रामधुनच जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पूर्वी १५०-१६० दिवसांपर्यंत गाळप हंगाम घेतला जात होता, तो सध्या ८० ते ९० दिवसांपर्यंत कमी झाला आहे.
ठोंबरे म्हणाले की, विस्मा ही संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंत सभासद साखर कारखान्यांसाठी प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना व साखर उद्योगातील संशोधन सभासद कारखान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध परिषदांचे आयोजन केले गेले व त्याचा सभासद कारखान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. ज्या खाजगी साखर कारखान्यांनी ‘विस्मा’चे सभासदत्व घेतले नाही, त्यांनी सभासद होवून एकजुटीने खाजगी साखर कारखान्यांचे शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्न,समस्या सोडवण्याकरीता पाठबळ द्यावे, असे आवाहन ठोंबरे यांनी केले. लोकमंगल साखर कारखाना समुहाचे अध्यक्ष महेश देशमुख यानी आभार मानले.
पुरस्कार विजेते साखर कारखाने पुढीलप्रमाणे :
१) सर्वोत्कृष्ट ऊस विकास श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (लि. जिल्हा. पुणे)
२) सर्वोत्कृष्ट तात्रिक व नविनतम कार्य (जयवंत शुगर्स लि. जिल्हा. सातारा)
३) सर्वोत्कृष्ट जैवउर्जा व जैवइंधनामध्ये कार्य (श्री गुरूदत्त शुगर्स लि. जिल्हा. कोल्हापूर)
४) सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन (द्वारकाधिश साखर कारखाना लि. जिल्हा. नाशिक)
५) सर्वोत्कृष्ट सामाजिक दायित्व (दालमिया भारत शुगर लि. जिल्हा, कोल्हापूर)
६) सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना (नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि. जिल्हा. धाराशिव)
नामांकित कंपन्यांच्या यंत्रसामग्रीचे प्रदर्शन…
सहकार मंत्री पाटील यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी साखर उद्योगासाठी यंत्र सामग्री बनवणाऱ्या नामांकित कंपन्यांच्या दालनांचे प्रदर्शनाचे उद्घाटन केले. राज्यातील नामांकित कंपन्या एस. एस. इंजिनिअर्स, व्हॅलिएंट बायोटेक, केबीके केम इंजिनिअरींग, राज प्रोसेस इक्विपमेंट्स ॲण्ड सिस्टीम, सुझलकेम टेक्नॉलॉजिस, ऑरबिया प्रिसीजन ॲग्रीकल्चर (नेटाफिम), सिएसआय कॉम्प्यूटेक, इकोबोर्ड इंडस्ट्रिज, टीजेएसबी बैंक, पेस्टोसिस व टाटा ब्लूस्कोप स्टिल इत्यादी एकूण ११ कंपन्यानी प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या होत्या.
‘विस्मा’ची सन २०२४-२५ साठीची वार्षिक सर्वसाधारण सभा …
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) ची सन २०२४-२५ साठीची वार्षिक सर्वसाधारण सभा २१ ऑगस्ट २०२५ रोजी सिध्दी साज गार्डन, एरंडवणा, पुणे या ठिकाणी दुपारी 3 वाजता आयोजित केली होती. वार्षिक सभेमध्ये ‘विस्मा’च्या सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी स्वागत केले. ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी वार्षिक सभेच्या विषयपत्रिकेनुसार, महासचिव डॉ. पी. ए. राऊत यांच्या सुचनेनुसार सर्व विषयाचे वाचन केले, ‘विस्मा’चे लेखा परिक्षक राम नेहेरे यांनी सन २०२४-२५ चा ताळेबंद व आर्थिक पत्रक पत्रक यांचे विश्लेषण केले. सभासदांच्या शंकांचे समाधान केले. उपस्थित सर्व सभासदांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली. ‘विस्मा’चे महासचिव डॉ. पी. ए. राऊत यांनी आभार मानले.