जयसिंगपूर : टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादकतेसाठी (जैवऊर्जा उत्पादन) राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन (विस्मा) च्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा पुणे येथे आयोजित कार्यक्रमात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. शुगर व बायोएनर्जी क्षेत्रातील या पुरस्कारांचे वितरण खास कार्यक्रमात करण्यात आले. कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला.
श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी कारखान्याने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले की, साखर कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत बायोएनर्जी विभागावर भर दिला आहे. पोटॅश पावडरवर तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रॅन्युशन प्लँटच्या माध्यमातून सर्व पिकांना उपयुक्त दाणेदार ‘त्रिमूर्ती पोटॅश’ खताचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्यांना शेतकऱ्यांना बिनव्याजी अल्पदरात उत्पादित पोटॅश खत उपलब्ध करून दिले जाते.