धाराशिव : रांजणी येथील नॅचरल शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज कारखान्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनतर्फे (विस्मा) पुणे येथे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०२४-२५ मधील खासगी साखर उद्योगातील विशेष कार्याबद्दल साखर कारखान्यांना यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी सहकारमंत्री पाटील यांनी साखरेची एमएसपी वाढावी यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले.
पुरस्कारानंतर अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, नॅचरल शुगरने गेल्या २५ वर्षांमध्ये विविध ३२ उपपदार्थ उत्पादनांचे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. साखरेपासून ते ग्रीन हायड्रोजनपर्यंतची सर्व उत्पादने कारखाना घेत आहे. हा केवळ साखर कारखाना नसून ऊर्जा केंद्र झाले आहे. सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा बहुमान मिळाल्याबद्दल आनंद झाला. पुरस्कार वितरण प्रसंगी ‘विस्मा’चे महासचिव डॉ. पांडुरंग राऊत, ‘विस्मा’चे उपाध्यक्ष नीरज ‘शिरगावकर, ‘डीएसटीए’चे अध्यक्ष शहाजीराव भड, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, पुरस्कार निवड समिती सदस्य तसेच खासगी, सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.