सोलापूर : जिल्ह्यातील ३५ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या साखर हंगामाची तयारी केली आहे. तोडणी यंत्रणा व इतर कारणांमुळे एखादा साखर कारखाना सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह आहे. मात्र, यंदा ३२ ते ३४ साखर कारखाने हंगाम घेतील, असे सांगण्यात आले. मात्र, अद्याप गेल्या हंगामाचे पैसे मिळवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्ह्यातील आठ साखर कारखानदारांनी ऑगस्ट महिन्यातही शेतकऱ्यांच्या उसाचे ५३ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत, असे साखर सहसंचालक कार्यालयाकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या हंगामात काही साखर कारखानदारांनी संपूर्ण एफआरपी न देता दिल्याचे दाखविले अशी धक्कादायक बाब उघड झाली. जिल्ह्यातील काही कारखाने शेतकऱ्यांना दरवर्षी वेळेवर उसाचे पैसे देत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादकांसाठी जाहीर केलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण देणे कधी चुकते होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे २३ कोटी १५ लाख रुपये, इंद्रेश्वर शुगर बार्शीकडे २ कोटी ६१ लाख रुपये, जय हिंद शुगरकडे १० कोटी ८८ लाख रुपये, गोकुळ शुगरकडे ६ कोटी ४ लाख रुपये, सिद्धनाथ शुगर (तिऱ्हे) कडे १ कोटी ८५ लाख रुपये, भीमा सहकारी (टाकळी सिकंदर) कारखान्याकडे १ कोटी १९ लाख रुपये, मातोश्री लक्ष्मी शुगरकडे ५ कोटी ३८ लाख रुपये आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे २ कोटी ६१ लाख रुपये अडकले आहेत. या कारखान्यांवर आरआरसीनुसार महसूल विभाग कारवाई करीत आहे असे साखर सहसंचालक सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.