शिरोळ : भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली व राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाल, हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाल (हरयाना) येथे पाच दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये श्री दत्त साखर कारखान्यातर्फे राबवलेल्या जमीन क्षारपड मुक्तीबाबतची माहिती देण्यासाठी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. पाटील यांनी पाणस्थळ आणि क्षारपड जमिनीमध्ये सच्छिद्र पाईप प्रणाली या श्रीदत्त पॅटर्नची माहिती दिली. यातून क्षारपड व पाणथळ जमिनी पिकाऊ बनत आहेत, जमीन सुधारणांबाबत दत्त पॅटर्न उपयुक्त ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण केले. कर्नालच्या राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. आर. के. यादव, डॉ. बुंदेला, दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, कीर्तीवर्धन मरजे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपडमुक्तीसाठीचे फायदे, त्याची यशोगाथा सांगितले. राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत मिळालेल्या अनुदानासंदर्भात सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत राज्यांमध्ये जमीन क्षारपड मुक्तीसंदर्भात काम केले जाणार आहे. यामध्ये शासनाचे ८० टक्के आणि शेतकऱ्यांची २० टक्के रक्कम या आधारावर होणाऱ्या कामाची माहिती अधिकारी, अभियंत्यांना होण्यासाठी हे प्रशिक्षणाचे आयोजित केले आहे.